धुळे तालुक्यातील बोरिस गावात एकाच रात्री सलग १५ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरफोड्या झाल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. चोरट्यांनी आता शहरी भागापाठोपाठ ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला असून, या धाडसी कारवायांमुळे पोलिस यंत्रणेलाही खुले आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या घरफोड्यांमध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे ५० लाखांहून अधिक मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ही मालिका घरफोडीची घटना मध्यरात्री १२ ते पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. गावातील अनेक घरांमध्ये एकाच पद्धतीने कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करत मौल्यवान वस्तू व रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा बोरिस गावाचे रहिवासी सुभाष शिवाजीराव देवरे यांच्या घरातून तब्बल १५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे.



